
संतोष पडवळ – प्रतिनिधी
मुंबई ता ५ जुलै : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी पुण्यातील एका कार्यक्रमात भाषणाच्या शेवटी ‘जय गुजरात’, असे म्हटले होते. मराठीच्या मुद्द्यावरुन राज्यातील वातावरण तापले असताना शिंदे यांच्या या घोषणेमुळे गदारोळ झाला होता. यावर ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजच्या विजयी मेळाव्यात शिंदेंना काल एक गद्दार म्हणत चांगलच डिवचलं आहे.
एकनाथ शिंदे यांच्या या वक्तव्याचा ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात समाचार घेतला जाणार, असे बोलले जात होते मात्र, मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात शिंदेंचा उल्लेख केला नाही. परंतु, उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात एकनाथ शिंदे यांचा यथोचित समाचार घेतला.
उद्धव ठाकरे आपल्या भाषणात एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता म्हटले की, काल एक गद्दार ‘जय गुजरात’ बोलला. अरे किती लाचारी करायची? पुष्पा पिक्चरमध्ये हिरो दाढीवरुन हात फिरवून म्हणतो, ‘झुकेगा नय साला’. पण आपले गद्दार म्हणतात, ‘कुछ बी बोलो, उठेगा नही साला’. असा खरपूस समाचार घेत हिंदी भाषेच्या सक्तीला विरोध न करणारा बाळासाहेबांच्या विचाराचा पाईक असू शकेल का? आपला मालक आला म्हणून त्याच्या समोर जय गुजरात म्हणणारा बाळासाहेबांच्या विचाराचा पाईक असू शकेल का?, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला. आपण आता डोळे उघडले नाहीत तर पुन्हा कधी आपले डोळे उघडण्याची वेळ येणार नाही. आता आलेली जाग जाणार असेल तर भविष्यात स्वत:ला मराठी आईची मुलं बोलू नका, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज यांच्यासोबत एकत्र येण्याबाबत भाष्य केले. आम्ही आता एकत्र आलो आहोत, ते एकत्र राहण्यासाठीच. आज आमच्या भाषणापेक्षा आमचं एकत्र दिसणं महत्वाचं आहे. आमच्या दोघांतील अंतरपाट अनाजीपंतांनी दूर केला आहे. आता अक्षता टाकायची गरज नाही. एकत्र आलो आहोत, एकत्र राहण्यासाठी, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला.
बाळासाहेब ठाकरे यांनी म्हटले होते, कोणावरही अन्याय करु नका. पण कोणी आपल्यावर हात उगारला तर तो हात जागेवर ठेऊ नका. देवेंद्र फडणवीस म्हणतात भाषिक गुंडगिरी सहन करणार नाही. फडणवीसांचे सगळे चेलेचपाटे हेच म्हणतात. पण मराठी माणूस इतर राज्यांमध्ये जाऊन कोणावर भाषिक दादागिरी करेल का? इतर राज्यांमध्ये कोणी असे केले तर भाषिक दादागिरी करणाऱ्या व्यक्तीला चिरुन टाकतील, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
भाजप महायुती सरकारने हिंदी सक्ती लादण्याचा प्रयत्न केला त्यामुळे राज्यात तीव्र संतापाची लाट उसळली. या विरोधात ठाकरे शिवसेना गटाचे उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी संयुक्तपणे मोर्चा काढण्याचा इशारा देताच अवघ्या काही दिवसांत सरकारने हिंदीचा निर्णय मागे घेतला. याच पार्श्वभूमीवर आज वरळी डोममध्ये ‘विजय मेळावा’ पार पडला.
या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपवर जोरदार हल्लाबोल केला ठाकरे म्हणाले की, बऱ्याच वर्षानंतर राज आणि माझी राजकीय व्यासपीठावर भेट आहे. सन्माननीय राज ठाकरे असा उल्लेख करतो. राज यांनी अतिशय चांगली मांडणी केली आहे. आज आमच्या भाषणा पेक्षा आमचं एकत्र दिसणं महत्वाचं आहे. आमच्या दोघांतील अंतरपाट अनाजीपंतांनी दूर केला आहे. आता अक्षता टाकायची गरज नाही. एकत्र आलो आहोत, एकत्र राहण्यासाठी, असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला.
अनेक बुवा महाराज बिझी आहेत. कोण लिंबू कापतंय, कोण रेडा कापतोय. माझ्या आजोबांनी या भोंदूपणा विरोधात लढा दिला होता आणि त्यांच्यासाठी आम्ही एकत्र आलो आहे. वापरायचं आणि फेकून द्यायचं, असं यांचं काम आहे. आता आम्ही दोघे तुम्हाला फेकून देऊ. तुमच्या डोक्यावर बाळासाहेब ठाकरे यांचा हात नसता तर कुठे असता तुम्ही? अशा शब्दात भाजपवर टिका केली.
महाराष्ट्रात मराठी माणूस न्याय मागत असेल आणि तुम्ही त्याला गुंड म्हणत असाल तर आम्ही गुंड आहोत. अशा शब्दात त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टिका केली. मराठी माणूस मुंबई बाहेर नेला, असं तुम्हाला वाटत असेल तर २०१४ नंतर मुंबईतील उद्योगधंदे गुजरातला कसे गेले? तुम्ही आमच्यात गद्दारी करवली आणि आमचं सरकार पाडलं. तुमचे मालक तिकडे गुजरातला बसले आहेत. दोन व्यापारी त्यांच्यासाठी तुम्ही हे करत आहात, अशी टीका त्यांनी यावेळी भाजपवर केली.
—00—