दिव्यातील मान्यताप्राप्त शाळा बेमुदत बंद ठेवणे बेकायदेशीर – सौ. सुदर्शनाताई त्रिगुनाईत (महाराष्ट्र इंग्लिश स्कुल महासंघटना संस्थापक)
दिव्यातील शाळेचा प्रत्येक विद्यार्थी हा दिवेकर म्हणून आमची बांधिलकी – रमाकांत मढवी, शहरप्रमुख दिवा

मान्यताप्राप्त शाळा बंद करणे बेकायदेशीर – सुदर्शनाताई त्रिगुनाईत.
संतोष पडवळ – प्रतिनिधी
ठाणे ता २८ जून : दिवा शहरात मान्यता नसलेल्या शाळांतील विद्यार्थी गुणगौरव सोहळा व पालक मेळावा आकांक्षा हॉल मध्ये आयोजित करण्यात आला होता. प्रसंगी अधिकृत व अनधिकृत शाळांचा विषय चांगलाच चर्चेला आला असून काही मान्यता प्राप्त शाळा आणि काही राजकीय पक्षांनी अनधिकृत शाळा बंद कराव्यात यासाठी कंबर कसली आहे. अनधिकृत शाळा तत्काळ बंद न केल्यास दिवा शहरातील सर्व अधिकृत शाळांनी १ जुलै पासून बेमुदत बंद पुकारला आहे. अधिकृत शाळांच्या शिष्टमंडळाने भाजप आमदार संजय केळकरांनी नुकतीच भेट घेतल्यावेळी आमदारांनी या शाळांचा पाणी पुरवठा आणि वीज खंडित करावी आणि सर्व संचालकांवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी पोलिस आयुक्तांकडे केली आहे. याशिवाय काही राजकीय पक्षाने न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान होत असल्यामुळे दिवा शहरातील अशा सर्व शाळा ताबडतोब बंद करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी म्हणून शिक्षण अधिकाऱ्यांची भेट घेतली होती.
ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली आहे, यामध्ये दिव्यासाहीत ठाणे महानगर पालिका क्षेत्रातील ८२ शाळांचा या यादीमध्ये समावेश आहे. एकट्या दिवा शहरातील अनाधिकृत शाळांचा विचार केल्यास या शाळांमध्ये जवळपास २० हजार पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत असून १२०० पेक्षा शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी काम करत आहेत. मागील दोन वर्षापासून नवीन शाळांच्या मान्यतेची ऑनलाईन प्रक्रिया बंद असल्यामुळे तसेच दिवा शहरात ओसी आणि सीसी घेताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी यामुळे मान्यता प्राप्त करण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत. दिवा शहराची भौगोलिक परिस्थिती बघता व सी.आर.झेड च्या जाचक अटींचा विचार करता येथे अधिकृत शाळा बांधणं हे तांत्रिक दृष्ट्या तरी शक्य नाही. अशातच दिवा शहरात राहण्यासाठी आलेल्या सर्वसामान्य नागरिकांना परवडतील अशा शाळा दिवा शहरात मोठ्या प्रमाणात सुरू झाल्या आहेत.
सदर मेळाव्याला दिवा शिवसेना शहरप्रमुख रमाकांत मढवी यांनी मार्गदर्शन करताना दिव्यातील सर्व शाळांतील प्रत्येक विद्यार्थी हा दिवेकर म्हणून आमची बांधिलकी असल्याचे स्पष्ट केले तर आपला शैक्षणिक दर्जा मजबूत करून मान्यतेसाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्याचे आवाहन केले आहे. तर अनधिकृत शाळांत शिक्षण घेणाऱ्या एकाही विद्यार्थ्यांच नुकसान होणार नसून शिवसेना ठामपणे या शाळांच्या पाठीशी उभी राहील असे उपशहर प्रमुख आदेश भगत यांनी स्पष्ट केले आहे. तर मान्यताप्राप्त शाळा बंद करणे हे बेकायदेशीर असून मान्यता असलेल्या शाळांची मान्यता कशी मिळाली याचा सौ. सुदर्शनाताई त्रिगुनाईत या उलगडा करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. प्रसंगी मा. नगरसेवक दीपक जाधव, अमर पाटील, उमेश भगत यांच्यासह अनेक मान्यवर व मान्यता नसलेल्या सर्व शाळांचे संस्थाचालक उपस्थित होते.



