मुंबईत कोष्टी समाजाचे स्वमालकीचे सभागृह होण्यासाठी एकत्रित पुढाकार घ्यावा – सचिन देवांग

मुंबई ता ७ जुलै ( गुरुनाथ तिरपणकर) : मुंबईत कोष्टी समाजाचे स्वमालकीचे सभागृह झाल्यास मुंबई व ठाण्यात कार्यरत समाजाच्या धर्मादाय संस्था व समाज बांधवांचा सामाजिक प्रश्न सुटून पैशाची बचत होईल यासाठी मुंबईतील कोष्टी समाज समूहाने एकत्रित प्रयत्न केल्यास अशक्य नाही असे देवांग देवांगन कोष्टा कोष्टी फेडरेशनचे राष्ट्रीय सचिव व कोष्टी व्हिजन ट्रस्ट चे संस्थापक ॲड. सचिन देवांग म्हणाले.
समस्त कोष्टी समाज सेवा संस्था मुंबईचे वतीने पाच जुलै रोजी कुर्ला, मुंबई येथे आयोजित स्नेह-मेळावा व गुणगौरव समारंभात देवांग प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
कुणाचे कार्याचा लेखाजोखा न काढता आपल्या कार्याची उंची वाढवू पण एखाद्या ठिकाणी समाजहीत जोपासले जात नसेल तर वेळप्रसंगी कठोर भूमिका घ्यायला मागेपुढे पाहू नका. हक्का सोबत जबाबदारी देखील गरजेची आहे असे देवांग म्हणाले.
मुंबईतील धावते जीवनमान व वातावरणातील सवयी अंगवळणी पडल्याने मुंबई बाहेरील वातावरण व कुटुंबात समरस होणे अडचणीचे ठरते याकरिता मुंबई व ठाण्यातील विवाहईच्छुक मुला-मुलींचे नोकरी व व्यावसायिक गरजा ओळखून मुंबईतच वधुवर मेळावा घेण्यासाठी एकत्रित पुढाकार घेऊ असेही देवांग म्हणाले. नव्वद वर्षे वयाचे समाज भूषण ध्रुतराज तारळकर मेळाव्याचे अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर जेष्ठ मार्गदर्शक ज्ञानदेव सरोदे, दानशूर उद्योगपती अजय हजारे, संस्थेचे अध्यक्ष निवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर कांबळे व संस्थेचे पदाधिकारी होते.
कोष्टी व्हिजन ट्रस्ट (के.व्ही.टी.) चे विश्वस्तपदी मुंबई विभागातून दत्ता कडुलकर व शामल भंडारे यांची नेमणूक झाल्याने शामल भंडारे हिचा के.व्ही.टी. कार्याध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
समस्त कोष्टी समाज सेवा संस्था मुंबई तर्फे इयत्ता पहिली ते बारावीच्या मुला मुलींना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. सवित्ता डाके व दिलीपकुमार पाखले यांनी उपस्थित विद्यार्थी व पालकांचे प्रबोधन केले. संस्थेचे उपाध्यक्ष संतोष बाबर व लक्ष्मी टकले यांनी प्रस्तावना व संस्थेची माहिती सांगितली, खजिनदार राजेंद्र लिपारे तसेच मनोज कोष्टी यांनी समाज शिक्षण बाबत माहिती दिली. सूत्रसंचालन अस्मिता भंडारे, गीतांजली नेमाणे व सर्वेश कोष्टी यांनी केले. प्रचंड पाऊस पडत असताना मुंबई करांची उपस्थिती लक्षणीय होती. संस्थेचे अध्यक्ष सुधाकर कांबळे यांनी आभार व्यक्त केले.