कर्जत-नेरळ मार्गावरील नेरळ परिसरातील गतिरोधक मृत्यूचा सापळा ; एकाचा मृत्यू तीन गंभीर उबाठा नेरळ उपशहरप्रमुख संदीप उतेकर यांची गतिरोधक काढून टाकण्याची मागणी.

नेरळ : सुमित क्षिरसागर
नेरळ दि .३० मार्च २०२६ :
कर्जत-कल्याण राज्य मार्गावरील नेरळ हद्दीत बसविण्यात आलेले गतिरोधक सध्या चर्चेचा विषय ठरत असून यामुळे आता पर्यंत एकाचा अपघाती मृत्यू तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.दरम्यान या अपघाताला कारणीभूत असणाऱ्या ठेकेदार,प्रशासनावर कारवाई करण्यात यावी म्हणून नागरिकांकडून मागणी होत असून संताप देखील व्यक्त करण्यात येत आहे.

नेरळ जवळील बुरहानी पार्क या नावाने ओळखल्या जाणाऱ्या बांधकाम प्रकल्पाजवळ उभारण्यात आलेला नव्या प्रकारचा गतिरोधक सध्या वाहनचालकांसाठी जीवघेणा ठरत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. सदर स्पीड ब्रेकरची रचना नियमबाह्य व चुकीची असल्यामुळे या ठिकाणी सलग अपघात घडत असून नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
स्थानिकांच्या माहितीनुसार, या गतिरोधक ब्रेकरमुळे आतापर्यंत किमान तीन अपघात घडले आहेत. त्यापैकी एका भीषण अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वाहनचालकांमध्येही प्रचंड अस्वस्थता पसरली आहे.
याच ठिकाणी झालेल्या दुसऱ्या अपघातात शुभम हरेश राणे हा युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर मुलुंड येथील फोर्टिस हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. डॉक्टरांच्या माहितीनुसार त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे, ज्या ठिकाणी हा गतिरोधक उभारण्यात आला आहे, त्या ठिकाणी यापूर्वी कधीही अपघातांची नोंद झालेली नव्हती. गतिरोधक तयार झाल्यानंतरच अपघातांची मालिका सुरू झाल्यामुळे त्याच्या निकृष्ट आणि चुकीच्या बांधकामावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. अनेक वाहनचालकांनी अचानक उंच व अनियमित रचनेमुळे वाहनांवरील नियंत्रण सुटत असल्याची तक्रार केली आहे.
या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपशहर प्रमुख श्री. संदीप उतेकर यांनी या गंभीर प्रकरणाची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) यांना लेखी निवेदन सादर केले आहे. या निवेदनात संबंधित गतिरोधक तातडीने हटवावा तसेच भविष्यात अशा प्रकारच्या निकृष्ट कामांवर नियंत्रण ठेवावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
स्थानिक नागरिकांनीही प्रशासनाकडे तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत तातडीने कारवाईची मागणी केली आहे. “सुरक्षेसाठी उभारलेले गतिरोधकच जर अपघातांना कारणीभूत ठरत असतील, तर ही अत्यंत गंभीर बाब आहे. आणखी जीवितहानी होण्यापूर्वी प्रशासनाने त्वरित उपाययोजना करावी,” अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, या प्रकरणात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मात्र वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने पाहणी करून योग्य निर्णय घेणे अत्यावश्यक बनले आहे.



