आरोग्य व शिक्षणब्रेकिंग

ठाणे मनपाची पहिली क्रिस्टल हाऊस सीबीएससी शाळा ८ जूनपासून सुरू होणार.

0 5 1 8 8 7

 

संतोष पडवळ – प्रतिनिधी

ठाणे ता २ जून – ठाणे महानगरपालिकेची पहिली सीबीएसई बोर्डाची शाळा येत्या 8 जून 2026 पासून खारेगांव येथे सुरु होणार आहे. क्रिस्टल हाऊस इंडिया यांच्या सहकार्याने ‘ठाणे महानगरपालिका – क्रिस्टल हाऊस’ ही सीबीएसई बोर्डाची शाळा चालविण्यात येणार असून या शाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण, आधुनिक सुविधा तसेच सर्वांगीण विकासाच्या संधी उपलब्ध होणार असून या शाळेच्या कामकाजाचा आढावा आज महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी घेतला.

आज झालेल्या बैठकीस अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त शिक्षण डॉ. मिताली संचेती, उपनगरअभियंता विकास ढोले, विनोद पवार शुभांगी केसवाणी तसेच क्रिसीलचे पदाधिकारी उपस्थित होते. खारेगाव येथे सफायर रुग्णालयाजवळ ‘ठाणे महानगरपालिका – क्रिस्टल हाऊस शाळा’ असून ठाणे महापालिकेकडून शाळेसाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. यामध्ये ग्रंथालय, विज्ञान प्रयोगशाळा, संगणक कक्ष, भाषा प्रयोगशाळा, क्रीडा व कला विभागासाठी स्वतंत्र जागा, स्वच्छ पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, तसेच इमारतीची दुरुस्ती, रंगरंगोटी, लिफ्ट, सीसीटिव्ही यंत्रणा आणि अग्निशमन यंत्रणा बसविण्यात येत असून ही सर्व कामे 8 जूनपूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना आयुक्तांनी आज झालेल्या बैठकीत संबंधित विभागांना दिल्या. सध्या शाळेच्या इमारतीत रंगरंगोटी, खिडक्यांना ग्रील बसविणे, खेळाचे मैदान तयार करणे, अग्निशमन यंत्रणेची दुरुस्ती तसेच लिफ्ट दुरुस्तीची कामे अंतिम टप्प्यात असून शाळा सुरू करण्याची तयारी पूर्णत्वाकडे आली असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले.

क्रिस्टल हाऊस व्यवस्थापनाच्या जबाबदाऱ्यांमध्ये प्रशिक्षित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती, विद्यार्थ्यांना पूर्व प्राथमिक ते बारावीपर्यंत मोफत शिक्षण, गणवेश, पुस्तके व शैक्षणिक साहित्याचा पुरवठा, विद्यार्थ्यांसाठी भोजन व्यवस्था तसेच शाळेपर्यंत वाहतूक सुविधा यांचा समावेश आहे. याशिवाय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण, करिअर मार्गदर्शन आणि रोजगाराभिमुख प्रशिक्षण देण्यावरही भर देण्यात येणार आहे. सद्यस्थितीत नर्सरी ते दुसरीपर्यतचे वर्ग सुरू करण्यात येणार आहे. ठाण्यातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील सीबीएससी अभ्यासक्रमाचे शिक्षण उपलब्ध होणार असून, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठीही गुणवत्तापूर्ण शिक्षणाची नवी संधी निर्माण होणार असल्याचे आयुक्तांनी नमूद केले. ठाणे महापालिका आणि क्रिस्टल हाऊस यांच्यात 30 सप्टेंबर 2025 रोजी सामंजस्य करार (MoU) करण्यात आला आहे. हा करार 30 वर्षांसाठी लागू राहणार आहे. महापालिकेने प्रशासकीय मान्यता देत सीबीएससी बोर्डाची पूर्व प्राथमिक ते इयत्ता १२ वीपर्यंतची शाळा सुरू करण्यास मंजुरी दिली आहे.

1/5 - (1 vote)

शिवनेरी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 1 8 8 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे