नेरळमध्ये डासांविरोधात सामाजिक कार्यकर्ते केतन पोतदार यांसकडून स्वखर्चाने फवारणी मोहीम ; लोकप्रतिनिधिंचे दुर्लक्ष.
नेरळ: सुमित क्षिरसागर

नेरळ दि.१ एप्रिल २०२६:- नेरळ शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या डासांच्या प्रादुर्भावामुळे नागरिक हैराण झाले असताना, निवडून आलेले लोकप्रतिनिधी मात्र अजूनही आरोप-प्रत्यारोपांतच अडकलेले दिसत आहेत. अशा गंभीर परिस्थितीत सामाजिक कार्यकर्ते तथा माजी ग्रामपंचायत सदस्य केतन पोतदार यांनी पुढाकार घेत, स्वखर्चातून फवारणी मोहीम सुरू करत नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे.
‘बोलण्यापेक्षा कृती’! – केतन पोतदारांची स्वखर्चातून फवारणी मोहीम चर्चेत…

ग्रामपंचायत हद्दीत डासांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला असून, त्यामुळे डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनिया यांसारख्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे. मात्र, या पार्श्वभूमीवर प्रभावी उपाययोजना करण्याऐवजी स्थानिक लोकप्रतिनिधी केवळ बैठका आणि परस्परांवर आरोप करण्यातच व्यस्त असल्याचे चित्र समोर येत आहे.
याउलट, केतन पोतदार यांनी “बोलण्यापेक्षा कृती महत्त्वाची” हा दृष्टिकोन स्वीकारत प्रत्यक्ष मैदानात उतरून फवारणी मोहीम हाती घेतली आहे. त्यांनी आज विविध वाड्या-पाड्यांमध्ये जाऊन फवारणीची सुरुवात केली, ज्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सध्या लवालवाडी, सेवालाल नगर, खांडा, हेटकर आळी, वरची टेप आळी, भिताड आळी आणि ब्राम्हण आळी या भागांमध्ये डासांचा प्रादुर्भाव विशेषतः वाढल्याच्या तक्रारी आहेत. या भागांमध्ये प्राधान्याने फवारणी सुरू करण्यात आली आहे.
यासोबतच, ग्रामपंचायत हद्दीतील इतर नागरिकांनाही आवश्यकता भासल्यास फवारणीसाठी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी सुरज साळवी आणि दीपक आखाडे यांच्याशी संपर्क साधावा, असे पोतदार यांनी सांगितले आहे.
दरम्यान, “निवडून दिलेल्यांनी काहीच केले नाही, पण एक सामाजिक कार्यकर्ता मदतीला धावून आला,” अशी चर्चा सध्या नेरळमध्ये रंगत आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाच्या निष्क्रियतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
आज नेरळकरांना आश्वासनांची नाही, तर ठोस कृतीची गरज आहे — आणि ती कृती सध्या केतन पोतदार यांच्या माध्यमातून प्रत्यक्षात पाहायला मिळत आहे, हेच या मोहिमेतून स्पष्ट होत आहे.



