
ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य रॅली.
संतोष पडवळ – प्रतिनिधी
ठाणे ता ३ फेब्रु : भारत मुक्ती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा, राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चा व राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा (ठाणे जिल्हा) यांच्या संयुक्त विद्यमाने ओडिशा येथील राष्ट्रीय अधिवेशन रद्द करण्याच्या षडयंत्राविरोधात देशव्यापी आंदोलन करण्यात येणार असल्याचे कल्याण येथील पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आले. सदर पत्रकार परिषदेत बामसेफचे 42 वे राष्ट्रीय अधिवेशन आणि भारत मुक्ती मोर्चाचे 16 वे राष्ट्रीय अधिवेशन हे ओडिशा राज्यातील कटक येथे 5 दिवसांचे (26 ते 30 डिसेंबर 2025) आयोजित करण्यात आले होते.
मात्र आरएसएस प्रणित भाजपा सरकारने तेथील स्थानिक प्रशासनाला हाताशी धरून, षड्यंत्रपूर्वक या राष्ट्रीय अधिवेशनांची परवानगी रद्द करण्यास भाग पाडले असा गंभीर आरोप यावेळी करण्यात आला आहे.
सदर अधिवेशनांचे महत्त्व स्पष्ट करताना पदाधिकाऱ्यांनी सांगितले की हे अधिवेशन ईव्हीएम मशीनमध्ये सातत्याने होणाऱ्या गडबडी व संभाव्य घोटाळ्यांबाबत देशपातळीवर ठोस भूमिका घेण्यासाठी तसेच ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेबाबत ऐतिहासिक व निर्णायक पावले उचलण्यासाठी आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनासाठी देशभरातील हजारो कार्यकर्ते, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते तसेच परदेशातूनही डेलिगेट्स (प्रतिनिधी) येणार होते. हे विचारमंथन आणि निर्णय प्रक्रिया होऊ नये, म्हणूनच सत्ताधाऱ्यांनी जाणीवपूर्वक या कार्यक्रमाला विरोध करून तो रद्द करण्याचा प्रयत्न केला असे यावेळी स्पष्ट करण्यात आले. तसेच राष्ट्रीय अधिवेशन रद्द करणे म्हणजे संविधानातील कलम 14 (समानता), कलम 19 (अभिव्यक्ती व संघटन स्वातंत्र्य) आणि कलम 21 (जीवनाचा अधिकार) यांचे थेट उल्लंघन आहे याच अन्यायाच्या विरोधात संपूर्ण देशभरात विविध ठिकाणी आंदोलने सुरू असून त्याच देशव्यापी चरणबद्ध आंदोलनाचा भाग म्हणून दिनांक 05 फेब्रुवारी 2026, बुधवार रोजी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे 22 फेब्रू 2026 नागपुर येथे होणाऱ्या देशव्यापी महारॅली अंतर्गत जिल्हास्तरीय रॅली भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती देण्यात आली. ही रॅली कोणत्याही समाजाविरोधात नसून संविधान, लोकशाही आणि नागरिकांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठीची लोकशाहीवादी रॅली असल्याचे संघटनांच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.
आज जर समाज गप्प बसला तर उद्या संविधान फक्त पुस्तकात उरेल. आजचे मौन म्हणजे उद्याची गुलामगिरी म्हणून ठाणे जिल्ह्यातील सर्व नागरिक, युवक, महिला, विद्यार्थी, कामगार, कर्मचारी व संविधानप्रेमी जनतेने 05 फेब्रुवारी 2026 रोजी मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी होऊन या आंदोलनाला पाठिंबा द्यावा असे आयोजकांनी आवाहन केले आहे.



