नेरळमध्ये स्वच्छता घोटाळा उघड ; दोन वर्षांपासून ४ हजार कचराकुंड्या धूळखात पडून…
नेरळ: सुमित क्षिरसागर
नेरळ दि.२९ मार्च २०२६ : स्वच्छतेच्या नावाखाली मोठा हलगर्जीपणा उघडकीस आला असून, तब्बल ४ हजार घरगुती कचराकुंड्या गेली दोन वर्षे नागरिकांपर्यंत न पोहोचता एका गोडाऊनमध्ये धूळ खात पडून असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

हा प्रकार उघडकीस आणण्यात पंचायत समिती सदस्य भगवान चंचे आणि जिल्हा परिषद सदस्या सुनीता मोरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या पाठपुराव्यानंतर सध्याचे ग्रामसेवक अरुण कारले यांनी चौकशी करत थेट गोडाऊन गाठत या प्रकरणाचा भांडाफोड केला.

माहितीनुसार, तत्कालीन सरपंच उषा पारधी आणि ग्रामसेवक गणेश गायकर यांच्या कार्यकाळात १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून या कचराकुंड्या खरेदी करण्यात आल्या होत्या. मात्र, कुंड्या नेरळमध्ये दाखल होऊनही त्या नागरिकांना वितरित करण्यात आल्या नाहीत. परिणामी, सार्वजनिक पैशातून खरेदी केलेल्या या कुंड्या दोन वर्षे निष्क्रिय अवस्थेत पडून राहिल्या. या कुंड्यांवर “नेरळ ग्रामपंचायत” असे स्पष्टपणे लिहिलेले असल्याने हा प्रकार अधिकच गंभीर ठरत आहे. प्रकरण समोर आल्यानंतर तातडीने ट्रॅक्टर आणि टेम्पोच्या सहाय्याने सर्व कचराकुंड्या ग्रामपंचायत कार्यालयात आणण्यात आल्या आहेत.
आता या कुंड्या लवकरच नागरिकांना वितरित केल्या जातील, अशी माहिती भगवान चंचे आणि सुनीता मोरे यांनी दिली आहे. दरम्यान, या प्रकारामुळे नेरळ ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, प्रशासनातील निष्क्रियतेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. मात्र, सध्याच्या प्रयत्नांमुळे ग्रामपंचायत पुन्हा सक्रिय होत असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये रंगू लागली आहे.



