आरोग्य व शिक्षणब्रेकिंग

नेरळच्या वीजव्यवस्थेला मनुष्यबळाचा ‘बूस्टर डोस’! प्रत्येक १० हजार ग्राहकांमागे शाखा अभियंता व स्टाफ नियुक्त करण्याची जि.प.सदस्या सुनिता मोरे यांची ऊर्जामंत्र्यांकडे मागणी

[wps_visitor_counter]

 

नेरळ : सुमित क्षिरसागर

दि.५ ऑगस्ट २०२६:-नेरळ जिल्हा परिषद विभागातील वाढती लोकसंख्या, झपाट्याने होणारे शहरीकरण आणि वाढत्या विद्युत ग्राहकांच्या पार्श्वभूमीवर महावितरण विभागाचा कारभार अधिक सक्षम करण्यासाठी प्रत्येक १० हजार ग्राहकांमागे एक शाखा अभियंता व आवश्यक स्टाफची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी रायगड जिल्हा परिषदेच्या सदस्या तथा स्थायी समिती सदस्या सौ. सुनिता रोहिदास मोरे यांनी ऊर्जा राज्यमंत्री मा. मेघनाताई बोर्डीकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

नेरळ जिल्हा परिषद वॉर्ड हा माथेरान या महत्त्वाच्या पर्यटनस्थळाच्या पायथ्याशी असून, नेरळ व माथेरान परिसरात मागील काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टी व वादळी वाऱ्यामुळे महावितरणच्या पोल, एल.टी. लाईन तसेच ट्रान्सफॉर्मरचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. परिणामी विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांवर मोठा ताण निर्माण होत असल्याचे मोरे यांनी निवेदनात नमूद केले आहे.

निवेदनानुसार, नेरळ महावितरण क्र. १ अंतर्गत सुमारे २० हजार ग्राहक असून, नेरळ महावितरण क्र. २ अंतर्गत सुमारे २८ हजार ५९१ ग्राहक आहेत. या तुलनेत उपलब्ध मनुष्यबळ अपुरे पडत असल्याने आपत्कालीन परिस्थितीत वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी अधिक वेळ लागत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. नुकत्याच झालेल्या वादळी वाऱ्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी सुमारे सहा दिवसांचा कालावधी लागल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

नेरळ सेंट्रल रेल्वे स्थानक परिसरालगत असल्याने या भागाचे झपाट्याने शहरीकरण होत असून, दिवसेंदिवस विद्युत ग्राहकांची संख्या वाढत आहे. त्यामुळे भविष्यातील वाढती गरज लक्षात घेऊन महावितरणने मनुष्यबळ वाढविणे आवश्यक असल्याचे सौ. सुनिता मोरे यांनी सांगितले.

महावितरणच्या MPR Order No. 01/20220 NO-HR/GM(HR)/MPR/00117 प्रमाणे प्रत्येक १० हजार ग्राहकांमागे एक शाखा अभियंता व आवश्यक स्टाफची नियुक्ती करावी, अशी मागणी त्यांनी ऊर्जा राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांच्याकडे केली आहे. या मागणीमुळे नेरळ परिसरातील वीजपुरवठा व्यवस्था अधिक सक्षम होऊन आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना जलद सेवा मिळण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे