नेरळ कचरामुक्तीच्या दिशेने ग्रामपंचायतीचे मोठे पाऊल! नेरळच्या स्वच्छतेसाठी ‘परिवर्तन’चा झाडू: पंचायत समिती सदस्य भगवान चंचे यांच्या पुढाकाराने व्यापक स्वच्छता मोहीम

नेरळ : सुमित क्षिरसागर

कर्जत ता ३१ जुलै : नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील वाढत्या कचरा समस्येला आळा घालण्यासाठी आता ठोस पावले उचलण्यास सुरुवात झाली असून, कर्जत परिवर्तन आघाडीच्या पुढाकाराने आणि कर्जत पंचायत समिती सदस्य भगवान चंचे यांच्या संकल्पनेतून नेरळ परिसरात व्यापक स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या विशेष मोहिमेदरम्यान नेरळ परिसरातील विविध भागांमध्ये साचलेला तब्बल ३० ट्रॅक्टर घनकचरा हटविण्यात आला.

अनेक दिवसांचा कचरा हटविला; परिसराने घेतला मोकळा श्वास
नेरळमधील अनेक भागांमध्ये रस्त्याच्या कडेला, कचरा कुंड्यांमध्ये तसेच मोकळ्या जागांमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा साचला होता. त्यामुळे दुर्गंधी, अस्वच्छता आणि नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. याबाबत नागरिकांकडून सातत्याने तक्रारी होत होत्या.

या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद सदस्या सुनिता मोरे आणि पंचायत समिती सदस्य भगवान चंचे यांच्या पुढाकाराने विशेष स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली. जेसीबीच्या सहाय्याने कचरा कुंड्या, रस्त्यांच्या कडेला साचलेला कचरा तसेच विविध ठिकाणी जमा झालेला घनकचरा हटविण्यात आला. त्यानंतर हा कचरा डंपिंग ग्राउंडवर नेण्यात आला.
तब्बल ३० ट्रॅक्टर घनकचरा हटविण्यात आल्याने अनेक दिवसांपासून अस्वच्छतेच्या विळख्यात असलेल्या परिसराने अखेर मोकळा श्वास घेतला.
नेरळच्या विविध भागांत स्वच्छतेचा धडाका
ही स्वच्छता मोहीम केवळ एका भागापुरती मर्यादित न ठेवता नेरळ परिसरातील विविध ठिकाणी राबविण्यात आली.
नेरळ पाडा, मातोश्री नगर, गंगा नगर, निर्माण नगरी, साईकृपा सोसायटी, टेपआळी, भिताड आळी, चिंचवाडी, गणेशनगर, मोहोबी वाडी, खांडा, सम्राट नगर यासह विविध भागांमधील साचलेला कचरा हटविण्यात आला.
‘कचरा हटविण्याबरोबरच कायमस्वरूपी व्यवस्थापनावर भर’
एकदाच स्वच्छता मोहीम राबवून कचऱ्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार नाही, याची जाणीव ठेवून कचरा व्यवस्थापनाची प्रभावी आणि कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करण्यावर ग्रामपंचायत प्रशासनाने भर देण्याचे नियोजन केले आहे.
यासाठी प्रभागनिहाय स्वच्छता कर्मचारी नियुक्त करून नियमित कचरा संकलन, कचऱ्याची योग्य विल्हेवाट आणि परिसराची नियमित स्वच्छता अधिक प्रभावीपणे करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
यामुळे केवळ कचरा हटविण्यापुरती मोहीम न राहता भविष्यात नेरळमध्ये कचरा साचणार नाही, यासाठी शाश्वत व्यवस्था निर्माण करण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
नागरिकांच्या सहभागाशिवाय ‘कचरामुक्त नेरळ’ शक्य नाही!
नेरळ परिसर स्वच्छ, सुंदर आणि कचरामुक्त ठेवण्यासाठी प्रशासनाच्या प्रयत्नांना नागरिकांचा सक्रिय सहभाग मिळणे तितकेच महत्त्वाचे आहे. सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकता ग्रामपंचायतीच्या कचरा संकलन व्यवस्थेचा वापर करावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
‘स्वच्छ नेरळ, सुंदर नेरळ आणि कचरामुक्त नेरळ’ हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नागरिकांनीही आपली जबाबदारी ओळखून प्रशासनाला सहकार्य करण्याची गरज व्यक्त करण्यात आली.
या स्वच्छता मोहिमेत नेरळ ग्रामपंचायतीचे प्रशासक सुजित धनगर, ग्रामसेवक अरुण कारले तसेच ग्रामपंचायत स्वच्छता कर्मचारी यांनी सक्रिय सहभाग घेतला.
पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचाही उत्स्फूर्त सहभाग
या स्वच्छता मोहिमेत विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. शिवसेना ठाकरे गटाचे नेरळ शहर प्रमुख हेमंत क्षिरसागर, माजी सदस्य अतुल चंचे, संदिप उतेकर, प्रितम गोरी, संदेश लाड, रमेश पवार, सचिन चित्रे, सुजाता मोहिते, प्राची मनवे यांच्यासह उबाठा आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
‘स्वच्छ नेरळ’साठी सामूहिक निर्धार
स्वच्छता ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे, असा संदेश या मोहिमेतून देण्यात आला.
कचरा निर्मिती कमी करणे, सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकणे, नियमित कचरा संकलन व्यवस्थेला सहकार्य करणे आणि परिसर स्वच्छ ठेवणे या माध्यमातून नागरिकांनीही आपली भूमिका बजावावी, असे आवाहन करण्यात आले.
दरम्यान, नेरळला स्वच्छ, सुंदर आणि कचरामुक्त करण्याचा निर्धार या स्वच्छता मोहिमेदरम्यान व्यक्त करण्यात आला असून, आता ही स्वच्छता मोहीम सातत्याने सुरू राहणार का आणि कचरा व्यवस्थापनाची कायमस्वरूपी व्यवस्था कितपत प्रभावी ठरते, याकडे नेरळकरांचे लक्ष लागले आहे.



