खड्ड्यांत हरवला नेरळचा सावित्रीबाई फुले मार्ग ! रस्त्याला डम्पिंग ग्राउंडचे स्वरूप ; भटक्या श्वानांची भीती नेरळ ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात संताप ; संदीप उतेकरांचे निवेदन

नेरळ : सुमित क्षिरसागर

दि.१० ऑगस्ट २०२६ :- नेरळ शहरातील सम्राटनगर परिसरातील सावित्रीबाई फुले मार्ग ते बेकरी गल्लीमार्गे श्रीराजेंद्रगुरुनगर व मोहाचीवाडीच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावरील खड्डे, ठिकठिकाणी साचलेला कचरा आणि कचऱ्याच्या ढिगाऱ्यांवर वाढलेला भटक्या श्वानांचा वावर यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
या मार्गावरून शाळकरी मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक व वाहनचालकांची मोठ्या प्रमाणात ये-जा होते. मात्र, रस्त्याची दुरवस्था आणि अस्वच्छतेमुळे अपघातासोबतच आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे.
सावित्रीबाई फुले मार्ग व बेकरी गल्ली परिसरात नियमित कचरा संकलन होत नसल्याने कचऱ्याचे ढीग साचत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे परिसराला डम्पिंग ग्राउंडचे स्वरूप आले आहे.
या समस्येकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेरळ उपशहर प्रमुख तथा श्रीराजेंद्रगुरुनगर रहिवासी संघाचे अध्यक्ष संदीप नारायण उतेकर यांनी ७ ऑगस्ट रोजी नेरळ ग्रामपंचायतीचे प्रशासक व ग्रामविकास अधिकारी यांना निवेदन दिले.
“प्रशासनाला जाग येण्यापूर्वी एखादी दुर्घटना घडण्याची वाट पाहत आहात का?” असा संतप्त सवाल उतेकर यांनी उपस्थित केला आहे.
रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, कचरा हटवावा, नियमित कचरा संकलन सुरू करावे तसेच भटक्या श्वानांच्या प्रश्नावर योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने जागे होऊन कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे.



