नेरळच्या मृणाल खेडकरांच्या खांद्यावर भाजप महिला मोर्चाची नवी जबाबदारी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती; संघटनात्मक कार्याची पक्षाकडून दखल

नेरळ : सुमित क्षिरसागर
नेरळ, दि. २८ जुलै २०२६ : भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चामध्ये नेरळ येथील ज्येष्ठ आणि सक्रिय कार्यकर्त्या मृणाल प्रसन्न खेडकर यांच्यावर पक्षाने नवी महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. भाजप महिला मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी मृणाल खेडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे 
मृणाल खेडकर यांनी यापूर्वी भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश चिटणीस म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. पक्षाच्या संघटनात्मक बांधणीमध्ये सक्रिय सहभाग घेत त्यांनी महिला मोर्चाच्या माध्यमातून विविध सामाजिक व संघटनात्मक उपक्रमांमध्ये योगदान दिले आहे. महिला कार्यकर्त्यांना संघटित करण्यासोबतच पक्षाच्या विचारधारेचा विस्तार करण्यासाठी त्यांनी सातत्याने काम केले आहे.

संघटनात्मक कार्याची पक्षाकडून दखल ……
धडाडीच्या, अभ्यासू आणि सक्रिय कार्यकर्त्या म्हणून मृणाल खेडकर यांची नेरळ परिसरात ओळख आहे. पक्षाच्या विविध उपक्रमांमध्ये त्यांचा असलेला सक्रिय सहभाग तसेच संघटनात्मक कार्यातील योगदानाची दखल घेत भाजपने त्यांच्यावर प्रदेश पातळीवरील महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.
चित्रा वाघ यांच्या नेतृत्वाखाली नवी प्रदेश कार्यकारिणी
भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश अध्यक्षा आमदार चित्रा वाघ यांनी महिला मोर्चाची नवी प्रदेश कार्यकारिणी जाहीर केली. या नूतन कार्यकारिणीत महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी मृणाल प्रसन्न खेडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रदेश पातळीवरील या नव्या जबाबदारीमुळे मृणाल खेडकर यांच्या संघटनात्मक कार्याला आणखी व्यापक व्यासपीठ मिळणार असून, आगामी काळात महिला मोर्चाची संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी त्या महत्त्वाची भूमिका बजावतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
नेरळमधील स्थानिक कार्यकर्त्यापासून प्रदेश पातळीवरील जबाबदारीपर्यंतचा मृणाल खेडकर यांचा हा प्रवास त्यांच्या संघटनात्मक कार्याची आणि पक्षातील सक्रिय योगदानाची पावती मानला जात आहे.



