कर्जत: सुमित क्षिरसागर
कर्जत ता १५ :सध्या राज्यातील महापालिका, नगर परिषद, नगर पंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून सर्वच राजकीय पक्षांतील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली होती. मात्र नगर परिषद, नगर पंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या आरक्षणाची यादी समोर येताच अनेकांचे अनेक महिन्यांच्या मेहनतीचे मनसुबे धुळीस मिळाले आहेत. तर अनेक ठिकाणी नवनवीन चेहर्यांना आरक्षणानुसार सुसंधी उपलब्ध होणार असल्याने भविष्यात विविध ठिकाणी राजकीय समीकरणे बदलली जाणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. याच पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील कर्जत मतदार संघातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय समीकरणे बांधली जातील अस स्पष्ट चित्र निर्माण झाले आहे.
त्यानुसार कर्जत विधानसभा मतदार संघातील कडाव जिल्हा परिषद विभागासाठी नागरीकांचा मागास प्रवर्ग हे आरक्षण घोषित झाल्यानंतर काही दिवसांपूर्वीच याच विभागातील पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते विलास श्रीखंडे यांना कुणबी ओबीसी हे जात प्रमाणपत्र शासनाच्या माध्यमातून अधिकृतपणे उपलब्ध झाल्यानंतर सकल मराठा समाज बांधवांच्या उपस्थित त्यांना प्रदान करण्यात आले होते. त्यामुळे त्यांना सुद्धा याठिकाणी या आरक्षणानुसार निवडणूक लढविता येणार असल्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कुणबी ओबीसी दाखवल्यामुळे यानिमित्ताने त्यांना एक मोठी संधी निर्माण झाली आहे. त्यामुळे या संधीचा फायदा निश्चितच कडाव जिल्हा परिषद विभागातून एक सुशिक्षित व सुपरीचित चेहरा म्हणून विलास श्रीखंडे यांना होऊ शकतो अशी जोरदार चर्चा सध्या जनमानसात प्रचंड वेगाने सुरू झाली आहे. कारण, एक सर्वसमावेशक यशस्वी नेतृत्वगुण असलेल व्यक्तिमत्व म्हणून विलास श्रीखंडे यांची विशेष ओळख असल्याने त्यांच्या नावाला वाढती पसंती मिळत आहे.
रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामधील पोटल या गावातील रहिवासी असलेले विलास श्रीखंडे हे सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीमत्व असून गेली अनेक वर्षे पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रात सातत्याने महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत. तर, एक उच्च शिक्षित चेहरा असलेले विलास श्रीखंडे यांचा सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, आध्यात्मिक आणि राजकीय क्षेत्रात दांडगा जनसंपर्क असून सकल मराठा समाज बांधवांसह विविध जाती धर्माच्या समाज घटकांमध्ये त्यांचे मैत्रीपूर्ण व जिव्हाळ्याचे संबंध अनेक वर्षे त्यांनी वृद्धिंगत केले आहेत. त्यामुळे सर्वसमावेशक नेतृत्वगुण असलेले विलास श्रीखंडे यांनी कडाव जिल्हा परिषद विभागातून यंदाची सार्वत्रिक निवडणूक लढवावी अशी जोरदार चर्चा नागरीकांमध्ये सुरू झाली आहे.



