दिव्यातील रखडलेल्या उड्डाणपुलाचे अपयश कोणाच ? – मनसे. सात वर्षांपासून रखडलेल्या उड्डाणपुलाचा फटका रेल्वे वाहतुकीला
संतोष पडवळ – प्रतिनिधी
ठाणे ता १ जून : ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीतील वाढत्या लोकसंख्येचे शहर असलेल्या दिवा शहरात दिवसेंदिवस वाहतूक कोंडी समस्या वाढू लागली आहे. साधारण दिवा शहराची ६ लाखांच्या आसपास लोकसंख्या झाल्याने वाहनांची वाढती वर्दळ पाहता दिवा शहरात वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर होत असल्याने याचा फटका अनेकदा मध्य रेल्वेच्या रेल्वे वाहतूकीला पडत असल्याचे दिसून येत आहे. रखडलेल्या उड्डाणपुलाच्या अर्धवट कामामुळे नेहमी दिवा रेल्वे स्थानकाजवळ पूर्व-पश्चिम जाण्यास रेल्वे फाटकाजवळ वाहतूक कोंडी होते तर साबेगावकडे येणाऱ्या-जाणाऱ्या दिवा रेल्वे फाटक जवळून जावे लागते. परिणामी रेल्वे फाटक उघडले गेल्यास वाहतूक कोंडीमुळे लवकर बंद करण्यास रेल्वे सुरक्षा बलास अनेक अडचणी निर्माण होतात. त्यामुळे रेल्वे फाटक अनेक वेळा वेळेपेक्षा जास्त काळ सुरु राहिल्याकारणामुळे सिग्नल यंत्रणा थांबायच्या सूचना देऊन रेल्वेच्या वेळापत्रकावर मोठा परिणाम होतो व याचाच फटका मध्य रेल्वेला होत असताना दिसून येत आहे.
दिवा रेल्वे स्थानकाचे रेल्वे फाटक कायम स्वरूपी बंद करण्यासाठी ३ मार्च २०१९ मध्ये भूमीपूजन झालेले उड्डाणपुलाचे काम १८ महिन्यात पूर्ण होणारा पूल सन २०२५ सुरु होऊन सहा महिने होत आले तरीही काम सुरु असल्याचे दिसत नसल्याने प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे रेल्वे फाटक कायमस्वरूपी बंद होऊ शकले नाही. निवडणूका आल्यावर फक्त घोषणा दिल्या जातात व सत्ताधारी फक्त दिवा स्वप्न दाखवतात. त्यामुळे दिवा पुर्व-पश्चिम जाण्यास तासांनतास लागतात. परिणामी रखडलेल्या उड्डाणपुलाचे अपयश हे प्रशासन व सत्ताधारी यांचा असल्याचा रोष दिवा मनसेचे विभाग अध्यक्ष प्रकाश पाटील यांनी व्यक्त केला आहे. सदर राखडलेल्या उड्डाणपुलावर तात्काळ निर्णय घेऊन काम सुरु न झाल्यास दिवा मनसे आपल्या पद्धतीने आंदोलन करणार असल्याचे प्रकाश पाटील यांनी स्पष्ट केले आहे.




