नेरळमध्ये अनुभवायला मिळणार थरांचा थरार..! शिवसेना (शिंदेगट) व टोकरे फाउंडेशन आयोजित हंडीसाठी पुरुष गोविंदा पथकांसाठी ०१ लाख ३१ हजार १३१ रुपयांचे रोख पारितोषिक..
नेरळ – सुमित क्षिरसागर
तोच उत्साह, तीच तरुणाईची धुम, थरांचा थरार आणि गोविंदा रे गोपाळाचा जयघोष, मान्यवरांची मांदियाळी, गीत संगीतासह भगव्याचा जल्लोष यंदा शनिवार १६ ऑगस्ट २०२५ रोजी छत्रपती शिवाजी महाराज मैदान, नेरळ येथे पहायला मिळणार आहे.

दहीहंडीचा सोहळा साजरा करताना थर लावून सलामी देणाऱ्या प्रत्येक गोविंदा पथकांकरीता रोख बक्षीसे देण्यात येणार आहेत. दहीहंडी हा पारंपारिक उत्सव असला तरी तो एक साहसी खेळ आहे. याकार्यक्रमासाठी मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे, कर्जत मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे व माजी आमदार सुरेश लाड हे उपस्थित राहणार आहेत.
या दहीहंडी उत्सवात सुर नवा ध्यास नवा भावेश खाडे प्रस्तुत गोविंदा आला रे आला गायक कलाकारांचा नृत्य व संगीतमय जल्लोषमय कार्यक्रम असणार आहे. तसेच सुप्रसिध्द मराठी मालिकांमधील स्टार प्रवाह फेम तू ही रे माझा मितवा मधील शर्वरी जोग व अभिजीत आमकर उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्राच्या लोककलेचा नृत्याविष्कार आकर्षक नृत्याने प्रेक्षकांचे मनोरंजन तसेच या उत्सवात आपल्या सुमधूर व जल्लोषमय गाण्यांनी येणाऱ्या गोविंदांना बेधुंद करणार आहेत. त्याचबरोबर उत्तम असा साउंड तसेच नेत्रदिपक रोषणाई या कार्यक्रमाची शोभा वाढविणार आहे.
ही दहीहंडी यशस्वी आयोजन करण्याकरिता आयोजक. सुरेश टोकरे (माजी जिल्हा परिषद अध्यक्ष) तसेच शिवसेना शिंदेगट व टोकरे फाउंडेशन नेरळ ,सर्व शिवसेना पदाधिकारी, टोकरे फाउंडेशनचे मंडळाचे पदाधिकारी आदी विशेष प्रयत्न करीत असल्याचे सुरेश टोकरे यांनी नमूद केले आहे .



