नेरळ जवळील मोहिली (निकोप) परिसरात पुन्हा बिबट्याची दहशत ; वनविभागाची शोधमोहीम सुरू
कर्जत(नेरळ) : सुमित क्षिरसागर
ता ११ नोव्हेंबर : कर्जत तालुक्यातील नेरळ जवळील मोहिली–निकोप परिसरात पुन्हा एकदा बिबट्याच्या दर्शनाने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.रविवार रात्री अकराच्या सुमारास निकोप गावातील एक युवक दुचाकीवरून घरी जात असताना रस्त्याच्या कडेला जंगलाच्या भागात बिबट्या बसलेला दिसला. दुचाकीच्या हेडलाईटचा प्रकाश बिबट्यावर पडताच तो झट्क्यात जंगलात अदृश्य झाला.

सदर घटनेची माहिती तत्काळ वनविभागाला देण्यात आली. काही वेळातच मोहिली, निकोप आणि मानिवली गावचे ग्रामस्थ तसेच वन अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. रात्रीच जंगलात शोधमोहीम राबविण्यात आली; मात्र घनदाट उंच गवत आणि अंधारामुळे बिबट्याचा ठावठिकाणा लागला नाही.
सकाळी पुन्हा फॉरेस्ट विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल होऊन तपासणी केली. ग्रामस्थांसह त्यांनी जंगलात पाहणी केली असता प्राण्याच्या पायाचे ठसे स्पष्टपणे दिसून आले, ज्यावरून तो बिबट्याच असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या ठिकाणी शोधमोहीम सुरू असून बिबट्याचा वावर निश्चित करण्यासाठी कॅमेरे बसविण्याची तयारी वनविभागाने सुरू केली आहे.
वन विभागाने परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून, एकट्याने जंगलात न जाणे, लहान मुलांना खेळण्यासाठी बाहेर न पाठविणे, तसेच रात्रीच्या वेळी फिरताना उजेडाची बॅटरी किंवा काठी सोबत ठेवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
ग्रामस्थांमध्ये चर्चा रंगली असून, काही दिवसांपूर्वी याच परिसरात वाघ आल्याचीही चर्चा होती, मात्र ठोस पुरावा न सापडल्याने ती बाब दुर्लक्षित झाली होती. आता नव्याने सापडलेल्या पाऊलखुणांमुळे गावकऱ्यांत भीतीचे सावट पुन्हा पसरले आहे.
स्थानिकांनी वनविभागाने या भागात गस्त वाढवावी व बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवावे, अशी मागणी केली आहे.



