ब्रेकिंग ; गोव्यात क्लबला लागलेल्या आगीत 23 जणांचा दुर्दैवी मृत्यू.
संतोष पडवळ – प्रतिनिधी
गोवा ता ७ डिसें : गोव्यामधील एका क्लबला लागलेल्या आगीत 23 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. उत्तर गोव्यातील अर्पोरा गावात असलेल्या ‘बर्च बाय रोमियो लेन्स’ नावाच्या नाइट क्लबमध्ये 6 आणि 7 डिसेंबरच्या मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत 23 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 3 महिला आणि 20 पुरुषांचा समावेश असून, बहुतेक हे क्लबमधील कर्मचारी होते, तर काही पर्यटकही होते. आगीचे मुख्य कारण गॅस सिलिंडरचा स्फोट असल्याचा प्राथमिक अंदाज आहे, ज्यामुळे आग वेगाने पसरली आणि बहुतेक मृत्यू गुदमरून झाल्याचं सांगितलं जात आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी रात्रीच घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. मुख्यमंत्र्यांनी घडलेल्या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आणि सखोल चौकशीचे आदेश दिले.
“क्लबमध्ये अग्निसुरक्षा नियमांचे पालन झाले नव्हते, त्यामुळे व्यवस्थापन आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल,” असं मुख्यमंत्री सावंत म्हणाले. गोवा डीजीपी आलोक कुमार यांनी सांगितले की, पोलिसांना रात्री 12:04 वाजता आग लागल्याची माहिती मिळाली. तातडीने अग्निशमन दल, पोलिस आणि स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य सुरु करण्यात आलं. सर्व 23 मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, ते शवविच्छेदनासाठी गोवा मेडिकल कॉलेजमध्ये पाठवले गेले.



