कर्जत: सुमित क्षिरसागर
कर्जत: दि.27 : जिल्हा परिषदेच्या निवडणुकांसाठी जाहीर झालेल्या आरक्षण सोडतीत कर्जत तालुक्यात अनेक गट महिला राखीव झाले आहेत. गट महिला राखीव झाल्यामुळे आता इच्छुक नेत्यांची मोठी पंचाईत झाल्याने, नेत्यांनी होम मिनिस्टरला निवडणूक रिंगणात उतरवण्याची तयारी सुरू केली आहे. त्यादृष्टीने जिल्हा परिषद गटाची चाचपणीदेखील सुरू केली आहे. दिवाळीचे निमित्त करत, अनेक नेत्यांनी होम मिनिस्टरचे ब्रॅण्डिंग केले. त्यात नेमके कोणत्या होम मिनिस्टर मिनी मंत्रालयात पोहोचतात याकडे लक्ष लागले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ह्या मुदत संपून लांबणीवर पडल्या होत्या त्यानंतर होत असलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकांसाठी गटातून रिंगणात उतरण्यासाठी अनेक इच्छुक उमेदवार जोरदार तयारीत होते. त्याकरिता इच्छुक नेते सण असो की, उत्सव याचे निमित्त करत लोकांमध्ये संपर्कात होते. परंतु आरक्षण सोडतीमध्ये कर्जत तालुक्यातील अनेक गट महिला राखीव झाले. गट महिला राखीव झाल्याने गुडघ्याला बाशिंग बांधून असलेल्या नेत्यांची अडचण झाली. मात्र, या नेत्यांनी या अडचणीवर मात करत, आपल्या सौभग्यवतींना पुढे केले आहे. कर्जत तालुक्यातील डझनभराहून अधिक नेत्यांनी, ‘मी नाही, तर सौ’ मिनिस्टरांना निवडणूक रिंगणात उतरविण्याची तयारी केली आहे.
कर्जत तालुक्यात सर्वच इच्छुक उमेदवार आता निवडणुकींच्या तारखांन कडे डोळे लावून बसले आहेत.



