दिव्यात बस थांबा / शेड अभावी प्रवासी भर उन्हात. प्रशासनासह लोकप्रतिनिधिंचे अपयश.
संतोष पडवळ – प्रतिनिधी
ठाणे ता ३० मार्च : दिवा रेल्वे स्थानकात लोकल प्रवास करण्यासाठी प्रवाश्यांना जीवघेणा प्रवास करावा लागतो परंतू आता भर उन्हाळ्यात शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे बस थांब्यावर निवारा शेड अभावी ४० च्या आसपास वाढलेल्या तापमानात उभे रहावे लागत आहे. सदर चौकातून ठाणे महानगरपालिकेच्या टी.एम.टी, नवी मुंबईच्या एन.एम.एम.टी. बसेसची नेहमीच वर्दळ पहायला मिळते. मात्र, जिथे टी. एम.टी. बसचे थांबे आहेत त्या ठिकाणी प्रवाशांना ना हक्काचा बस थांबा, ना आश्रयासाठी शेड अशी गैरसोय पहायला मिळत आहे. त्यामुळे विशेषतः विद्यार्थी, गरोदर महिला, आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पहायला मिळत असून, संबंधित ठाणे महानगरपालिका परिवहन प्रशासनाने शिळफाटा जंक्शन नाक्यापासून ते दिव्यापर्यंत प्रमुख मार्गांवर हक्काचे शेडसह बस थांबे उभे करावे अशी आग्रही मागणी होत आहे.
विशेष म्हणजे अनेक ठिकाणी बस थांब्याजवळ खासगी वाहतूक करणाऱ्या वाहने उभी असलेली पहायला मिळतात. त्यामुळे, नाइलाजस्तव आलेल्या बसेस भर रस्त्यावर उभ्या राहत असल्याने, त्यातून मार्ग काढत प्रवाशांना बसमध्ये चढताना तारेवरची कसरत करावी लागते. दरम्यान, प्रवाशांचा चांगला प्रतिसाद ठाणे महानगरपालिकेच्या टी. एम.टी, नवी मुंबई महानगरपालिकाच्या एन.एम.एम.टी. मिळत असूनही, मूलभूत सोयी-सुविधां अभावी प्रवासी वंचित रहात असल्याचे वास्तव परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी, सार्वजनिक वाहतूक सक्षम केली पाहिजे, असे मत अनेक संस्था, संघटनांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे, ठाणे आणि नवी मुंबई कडून येणाऱ्या व जाणाऱ्या टी.एम.टी. आणि एन.एम.एम.टी.बसच्या फेऱ्यासुद्धा वाढविण्यात आल्या त्यास नागरिकांनी सुद्धा चांगला प्रतिसाद दिला. दिवसभर दिवा परिसरातील सर्वच बसेस प्रवाशांनी तुडुंब भरून ये जा करतात. मात्र ज्या ठिकाणी बसेस थांबतात त्या ठिकाणी, अधिकृत बस थांबा निदर्शनास पडत नसल्याने तसेच प्रवासी भर उन्हात बसची वाट पाहत उभे असतात. शिळफाटा जंक्शन नाका, खार्डीगांव, दिवा प्रभाग समितीसह परिसरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला उत्तम प्रतिसाद देत असूनही, प्रवाशांना मात्र ना हक्काचा बस थांबा, ना आश्रयासाठी शेड अशा गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. याकडे, ठाणे महानगरपालिका परिवहन प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. दिव्यातील प्रवाश्यांना सुविधा मिळत नसल्याने हे दिवा शहरातील सर्व लोकप्रतिनिधिंचे अपयश असल्याचे प्रवाश्यांनी स्पष्ट सांगितले आहे.



