संतोष पडवळ – प्रतिनिधी
ठाणे, दिवा ता ११ जून : वाढत्या लोकसंख्येच्या दिवा शहरात वाढत्या गुन्हेगारींच्या पार्श्वभूमीवर महिलांवरील अन्याय व अत्याचारांमुळे त्यांच्या तक्रारीची दखल घेण्यासाठी तात्काळ एक महिला अधिकारी व दोन महिला कर्मचारी नियुक्त करण्याची मागणी दिवा भाजप महिला मोर्च्याच्या अध्यक्षा सौ सपना रोशन भगत यांनी केली आहे. दिवा पोलीस चौकीत काही महिन्यापूर्वी महिला पोलिस अधिकाऱ्यांना बसण्यासाठी जागा नाही या कारणास्तव पुन्हा मुंब्रा पोलिस स्टेशन येथे नियुक्त करण्यात आले होते तरी ही खूप हास्यस्पद बाब आहे असे सपना भगत यांनी सांगितले आहे.
दिव्यात वाढती लोकसंख्या पाहता कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने महिलांवर होणाऱ्या अन्याय व तक्रारीसाठी महिला अधिकारी असने आवश्यक आहे. त्या दृष्टीने तात्काळ दिवा पोलिस चौकीत कायमस्वरूपी महिला पोलिस अधिकारी पुन्हा नियुक्ती करावी. नुकतीच दिव्यातील सुरेश नगर भागात महिलेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न झाला होता याची तक्रार करण्यासाठी महीला रात्री १:३० वाजता पोलिस चौकीत गेली असता महिला पोलिस अधिकारी नसल्यामुळे तिची तक्रार घेतली नाही त्यावेळी तीला मुंब्रा पोलिस स्टेशनला जावे लागले. दिव्यातील महिलांना आपल्या तक्रारींच्या दृष्टीने तक्रारी मांडण्यासाठी महिला अधिकाऱ्याची अत्यंत गरज असून महिला वर्गातून कोणत्या ना कोणत्या खाजगी तक्रारी असतील तर त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो त्या अनुषंगाने दिवा पोलीस चौकीमध्ये महिला पोलीस अधिकारी व महिला पोलीस कर्मचाऱ्यांची तात्काळ व कायमस्वरूपी नियुक्ती करण्यात यावी असे दिवा भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा सपना रोशन भगत यांनी बोलताना स्पष्ट केल आहे.




