विद्यातीर्थ क्लासेसच्या ४१ वर्षांच्या शैक्षणिक परंपरेला साजेसा प्रेरणादायी पालक–विद्यार्थी सेमिनार
कर्जत: सुमित क्षिरसागर

कर्जत ता १८ जाने : विद्यातीर्थ क्लासेसच्या ४१ वर्षांच्या भक्कम शैक्षणिक परंपरेला साजेसा, “शिक्षण आणि आनंदी पालकत्व” या विषयावरील पालक सेमिनार मोठ्या उत्साहात पार पडला. १९८५ साली स्थापन झालेल्या विद्यातीर्थ क्लासेसने गेल्या चार दशकांहून अधिक काळ विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्य केले आहे, याचेच हे एक उत्तम उदाहरण ठरले.
या कार्यक्रमाला परिसरातील शेकडो पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत उपस्थिती लावली. सुप्रसिद्ध लाईफ कोच, लेखक व प्रेरणादायी वक्ते प्रा. विलास मुंगेकर यांनी पालकांना मार्गदर्शन केले. त्यांनी मुलांचा आत्मविश्वास कसा वाढवावा, अभ्यासाबरोबरच व्यायामाचे महत्त्व, योग्य दिनचर्या, तसेच सामाजिक व नैतिक मूल्यांचा विकास या महत्त्वाच्या विषयांवर सखोल आणि प्रभावी पद्धतीने चर्चा केली.
आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ अभ्यासच नव्हे तर मुलांचे मानसिक आरोग्य, शिस्त, सकारात्मक विचारसरणी आणि पालकांची भूमिका किती महत्त्वाची आहे, हे प्रा. मुंगेकर यांनी सोप्या उदाहरणांतून पटवून दिले. त्यांच्या विचारप्रवर्तक भाषणामुळे पालक मंत्रमुग्ध होऊन संपूर्ण कार्यक्रम लक्षपूर्वक पाहत होते.
कार्यक्रमाच्या शेवटी पालकांनी समाधान व्यक्त करत असे उपयुक्त उपक्रम सातत्याने आयोजित व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. विद्यातीर्थ क्लासेसने पुन्हा एकदा आपल्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच पालक–विद्यार्थी समन्वयावर भर देणारी दूरदृष्टी अधोरेखित केली.
हा सेमिनार म्हणजे केवळ एक कार्यक्रम नव्हता, तर विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पालकांना दिशा देणारा प्रेरणादायी अनुभव ठरला.



