कर्जत रेल्वे स्थानकात एक्सप्रेसमधून गुटखा तस्करी ; दोन जण अटकेत
कर्जत : सुमित क्षिरसागर
कर्जत दि.२४ मार्च: कर्जत रेल्वे सुरक्षा बलाने अवैध गुटखा आणि पान मसाल्याच्या तस्करीविरोधात मोठी कारवाई करत दोन संशयितांना अटक केली आहे. या कारवाईत सुमारे २ लाख ७१५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. शनिवारी सकाळी कर्जत रेल्वे स्थानकावर ही कारवाई करण्यात आली. इंदौर-दौंड एक्सप्रेस (क्र. 22944) प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर येताच आरपीएफचे कर्मचारी नियमित तपासणी करत होते. यावेळी एस-2 डब्यातून उतरलेल्या दोन व्यक्ती मोठ्या बॅगांसह संशयास्पद हालचाली करताना दिसल्या. चौकशीदरम्यान त्यांनी समाधानकारक उत्तरे न दिल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले. आरपीएफ पोस्टवर आणल्यानंतर पंचनामा करून बॅगांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा, पान मसाला आणि तंबाखू आढळून आले. जप्त मालामध्ये विमल, राजश्री, रजनीगंधा, तुलसी जर्दा यांसारख्या विविध ब्रँडचा समावेश आहे.
तपासादरम्यान आरोपींनी आपली नावे गोलू कुमार राजेंद्र कुमार (वय 23) आणि अंकुश कुमार हरी कुमार (वय 21), दोघेही कामोठे, पनवेल येथील रहिवासी असल्याचे सांगितले. या प्रकरणी पुढील कारवाईसाठी अन्न व औषध प्रशासन विभागाशी संपर्क साधून आरोपी आणि जप्त माल जीआरपी कर्जत यांच्या ताब्यात देण्यात आला आहे. गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू असून पोलिस उपनिरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली चौकशी सुरू आहे. या यशस्वी कारवाईत आरपीएफचे कर्मचारी बाबुशा इंगोले आणि शेषराव खिल्लारे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.



