कर्जत/खालापूर – सुमित क्षिरसागर
नेरळ ता ७ ऑक्टो : राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दि. 6 ऑक्टोबर रोजी मुंबईत पार पडलेल्या नगरपरिषद व नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणाचा सोडती काढण्यात आल्या. या सोडतीनंतर रायगड जिल्ह्यातील कर्जत खालापूर मतदार संघात येणाऱ्या खोपोली खालापूर कर्जत व माथेरान या नगरपरिषद व नगरपंचायतीमधील पडलेल्या नवीन आरक्षणामुळे राजकीय गणिते पूर्ण पुणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
माथेरान- सर्वसाधारण
कर्जत- ओबीसी महिला
खालापूर- ओबीसी महिला
खोपोली- सर्वसाधारण
पडलेल्या आरक्षणामुळे अनेकांचा भ्रमनिरास झाला असून त्यांचे मनसुबे धुळीस मिळाले आहेत. नगराध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर होताच स्थानिक राजकीय कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले. कोणत्या नगर परिषदेला कोणता प्रवर्ग मिळतो, यावर निवडणुकीत उमेदवार निवड ,पक्षनिहाय रणनीती व युती-आघाड्यांचे स्वरूप ठरत असते. नगराध्यक्ष पदाचे आरक्षण निश्चित झाल्यापासून सर्व राजकीय पक्षांची मोर्चे बांधणी सुरू झाली आहे. ज्या ठिकाणी अनपेक्षित आरक्षण आले आहे तेथे नवीन उमेदवारांचा शोध सुरू झाला आहे.
नवीन आरक्षणाच्या सोडतीत कर्जत खालापूर मतदार संघातील ४ पैकी २ नगराध्यक्षपदे विविध प्रवर्गातील महिलांसाठी राखून ठेवण्यात आली आहेत. तर २ ठिकाणी सर्वसाधारण आरक्षण पडल्या मुळे नेत्यांकडे इच्छुकांची भाऊगर्दी बघायला मिळत आहे. कर्जत व खालापूर या दोन ठिकाणी गुडघ्याला बाशिंग बांधुन बसलेल्या पुरुष उमेदवारांचा पुरता हिरमोड झाला आहे.



