अखेर दिवा रेल्वे स्थानकातील शौचालय प्रवाशांसाठी खुले….
संतोष पडवळ – प्रतिनिधी
ठाणे, दिवा ता १५ सप्टेंबर : संसदरत्न कार्यसम्राट खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नाने आणि दिवा रेल्वे प्रवासी संघटना व रेल्वे प्रवाशांच्या मागणीने दिवा स्थानकातील फलाट क्रमांक एकवर रेल्वे प्रवाशांसाठी सुसज्ज शौचालय बांधण्यात येत होतं, सदर शौचालयाचे काम हे पूर्ण झाल्यानंतर आज शिवसेना शहरप्रमुख रमाकांत मढवी यांच्या सूचनेनुसार शिवसेना उपशहर प्रमुख शैलेश पाटील, उपशहर प्रमुख व दिवा रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अँड आदेश भगत, नगरसेवक अमर पाटील, स्थानिक नागरिक अरविंद भोईर, सतीश म्हात्रे, शाखाप्रमुख नितीन ओतुरकर, आशिष शिंदे, सौ.कविता भोसले, सौ. अंजना सुतार, सौ. लीना चौगुले व इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित हे शौचालय आज प्रवाशांसाठी खुले करण्यात आले.


दिवा रेल्वे स्थानकात नऊ फलाट असून एकही फलाटावर शौचालयाची व्यवस्था नव्हती, त्यामुळे प्रवाशांना विशेषता महिला प्रवाशांना त्याचा विशेष त्रास होत होता. दिवा रेल्वे स्थानकात आज कोकण, पनवेल, वसई, मुंबई, कर्जत, कसारा या दिशेने लोकल सुटत असतात, त्यामुळे दिवा रेल्वे स्थानकात प्रवाशांची प्रचंड रेलचेल बघायला मिळते. मध्य रेल्वे मार्गावर सर्वात गर्दीचे स्थानक म्हणून देखील दिवा स्थानकाचा उल्लेख केला जातो. येथील प्रवाशांना शौचालयाची सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून दिवा रेल्वे प्रवासी संघटना सातत्याने प्रयत्नशील होती. कार्यसम्राट खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून दिवा स्थानकाचा कायापालट करण्यात आला आहे. सरकते जिने, नवीन तिकीट घर, आसन व्यवस्था, उपहारगृह, पिण्याच्या पाण्याची सोय, अशा विविध सुविधा खासदारांच्या माध्यमातून या स्थानकात देण्यात आल्या आहेत. प्रवाशांसाठी हे शौचालय खुले झाल्याने प्रवाशांनी यावेळी आनंद व्यक्त केला व खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, शिवसेना दिवा शहर व रेल्वे प्रवासी संघटनेचे आभार व्यक्त केले.




