वारली कलेतून साकारले बाप्पांचे आकर्षक मखर
ग्रामीण संस्कृती, पारंपरिक कलाकुसर आणि गणेश भक्तीचा अनोखा संगम; धामोते गावातील विरले परिवाराची सुंदर कलाकृती

नेरळ : सुमित क्षिरसागर
धामोते:दि.१५ सप्टेंबर २०२६: गणेशोत्सव म्हटला की आकर्षक सजावट, कलात्मक आरास आणि बाप्पांच्या आगमनाचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळतो. मात्र, पारंपरिक संस्कृती आणि स्थानिक कलेचा सुंदर मिलाफ साधत साकारण्यात आलेले मखर गणेशोत्सवाची शोभा अधिकच वाढवणारे ठरत आहे. धमोते गावात यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त वारली कलेच्या माध्यमातून साकारण्यात आलेले आकर्षक मखर परिसरातील नागरिकांचे आणि गणेशभक्तांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे.

कोल्हारे ग्रामपंचायतीच्या मा. सदस्या सौ. साक्षी सोमनाथ विरले, भावना विरले, रंगनाथ गणपत विरले आणि ओंकार सोमनाथ विरले यांनी एकत्रितपणे हे पारंपरिक मखर साकारले आहे. मखराच्या निर्मितीसाठी मातीच्या भिंती, पेंढ्याचे छप्पर, पारंपरिक भांडी, बांबूच्या वस्तू तसेच विविध नैसर्गिक साहित्याचा कल्पकतेने वापर करण्यात आला आहे. त्यामुळे संपूर्ण मखराला ग्रामीण जीवनशैलीचा अस्सल आणि देखणा साज प्राप्त झाला आहे.
वारली चित्रकला ठरतेय खास आकर्षण
या मखराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या समोरील भागावर साकारण्यात आलेली वारली चित्रकला. या चित्रांमधून ग्रामीण जीवन, शेतीची कामे, पारंपरिक नृत्य, घरे, झाडे तसेच महाराष्ट्राच्या लोकपरंपरेचे सुंदर दर्शन घडते. साध्या रेषा आणि नैसर्गिक शैलीतून साकारलेली ही चित्रे मखराच्या सौंदर्यात लक्षणीय भर घालत आहेत.
मखराच्या मध्यभागी विराजमान असलेले श्री गणराय, त्याभोवती करण्यात आलेली पारंपरिक आरास आणि ग्रामीण वातावरणाची हुबेहुब निर्मिती यामुळे भक्तांना जणू एखाद्या पारंपरिक गावाच्या संस्कृतीचा अनुभव मिळत आहे.
पारंपरिक संस्कृती जपण्याचा सुंदर प्रयत्न
आजच्या आधुनिक आणि आकर्षक सजावटीच्या काळात पारंपरिक कला आणि ग्रामीण संस्कृतीचा वारसा जपण्याचा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद ठरत आहे. “आपल्या पारंपरिक कला आणि संस्कृतीचे जतन व्हावे तसेच गणेशोत्सवाच्या माध्यमातून ही कला पुढील पिढीपर्यंत पोहोचावी,” या उद्देशाने ही सजावट करण्यात आली आहे.
नैसर्गिक साहित्याचा वापर, ग्रामीण जीवनाचे दर्शन घडवणारी रचना आणि वारली कलेची आकर्षक मांडणी यामुळे धमोते येथील हे मखर यंदाच्या गणेशोत्सवातील एक आगळेवेगळे आकर्षण ठरले आहे. या कलाकृतीचे परिसरातील नागरिक, गणेशभक्त आणि कला रसिकांकडून विशेष कौतुक होत आहे.



