दिव्यातील तिसाई नगरात १० दिवस विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल.
शिवसेना शाखाप्रमुख निलेश म्हात्रे यांचे उत्कृष्ट आयोजन

संतोष पडवळ – प्रतिनिधी
ठाणे, दिवा ता २१ ऑक्टो : तिसाई नगर येथे सालाबादप्रमाणे यंदाही शिवसेना शाखा तिसाई नगर आणि जय हनुमान मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दहा दिवसीय भव्य रास गरबा महोत्सव उत्साहात पार पडला. माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना शाखाप्रमुख तथा विशेष कार्यकारी अधिकारी निलेश रोहिदास म्हात्रे यांच्या वतीने ११ ते २० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत आयोजित महोत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दररोज रात्री ८ ते ११ या वेळेत महिला, तरुण-तरुणींसह नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत गरब्याचा आनंद लुटला.
महोत्सवात दररोज उत्कृष्ट गरबा सादर करणाऱ्या खेळाडूंसाठी आकर्षक बक्षिसांची योजना ठेवण्यात आली होती. तसेच विविध वेशभूषा स्पर्धांनाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. २० ऑक्टोबर रोजी रात्री विशेष रास गरबा आणि फॅन्सी ड्रेस स्पर्धेचा महाअंतिम सोहळा रंगला. लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत अनेक स्पर्धकांनी पारंपरिक व आकर्षक वेशभूषेत सहभाग घेतला. उत्कृष्ट गरबा नृत्य आणि वेशभूषेसाठी विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
गरबा महोत्सवाला केवळ सांस्कृतिक स्वरूप न देता सामाजिक बांधिलकीही जपण्यात आली. दहा दिवसांच्या कालावधीत विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आल्याने महोत्सवाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. गरब्याच्या तालासोबत सामाजिक संदेश देणाऱ्या उपक्रमांमुळे तिसाई नगर परिसरात उत्साह आणि मांगल्याचे वातावरण निर्माण झाले होते.
दहा दिवस चाललेल्या या महोत्सवाला स्थानिक नागरिक, कुटुंबे आणि मित्रपरिवाराने मोठ्या संख्येने उपस्थित राहून भरभरून प्रतिसाद दिला. महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी शिवसेना शाखा तिसाई नगर आणि जय हनुमान मित्र मंडळाचे पदाधिकारी, सदस्य व कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली. शाखाप्रमुख निलेश म्हात्रे यांच्या उत्कृष्ट नियोजनामुळे महोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या संपन्न झाला.



