दिव्यातील मान्यता नसलेल्या शाळांना न्याय मिळून देण्यासाठी प्रयत्नशिल – रमाकांत मढवी. संचालकांच्या शिष्टमंडळाला ठाणे पालिका आयुक्त सौरव राव यांचे सकारात्मक आश्वासन.
संतोष पडवळ – प्रतिनिधी
ठाणे ता ५ जून : दिवा शहरात अनधिकृत शाळांचा विषय चांगलाच चर्चेला आला असून काही मान्यता प्राप्त शाळा आणि काही राजकीय पक्षांनी अनधिकृत शाळा बंद कराव्यात यासाठी कंबर कसली आहे. नुकतेच एका राजकीय पक्षाने न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान होत आसल्यामुळे दिवा शहरातील अशा सर्व शाळा तात्काळ बंद करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी म्हणून शिक्षण अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. अशातच काल खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या सूचनेनुसार दिवा शिवसेना शहरप्रमुख तथा माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांच्या नेतृत्वाखाली तीस पेक्षा जास्त शाळांच्या संचालकांनी पालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतली. यावेळी दिवा शहरातील २५ हजार शालेय विद्यार्थ्यांचे भवितव्य खराब होऊ देणार नाही व मान्यता नसलेल्या शाळांना न्याय मिळून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे शिवसेना दिवा शहरप्रमुख रमाकांत मढवी यांनी जाहीर केले आहे.
दिवा शहरात अनधिकृत इमारतींचा विषय गाजत असताना आता मात्र अनधिकृत शाळांचा विषय चव्हाट्यावर आला आहे. ठाणे महानगरपालिकेने पालिका क्षेत्रातील सर्व अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली आहे यामध्ये दिव्यासाहीत ठाणे महानगर पालिका क्षेत्रातील ८२ शाळांचा या यादीमध्ये समावेश आहे. एकट्या दिवा शहरातील अनाधिकृत शाळांमध्ये २५ हजार पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आणि १२०० शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी काम करत आहेत. मागील दोन वर्षापासून नवीन शाळांच्या मान्यतेची ऑनलाईन प्रक्रिया बंद असल्यामुळे तसेच दिवा शहरात ओसी आणि सीसी घेताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी यामुळे मान्यता प्राप्त करण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत. दिवा शहराची भौगोलिक परिस्थिती बघता व सी.आर.झेड च्या जाचक अटींचा विचार करता येथे अधिकृत शाळा बांधणं हे तांत्रिक दृष्ट्या तरी शक्य नाही. अशातच दिवा शहरात राहण्यासाठी आलेल्या सर्वसामान्य नागरिकांना परवडतील अशा शाळा दिवा शहरात मोठ्या प्रमाणात सुरू झाल्या आहेत. अशा शाळांना मान्यता नसल्यामुळे या शाळा बंद कराव्यात अशी मागणी दिवा शहरातीलच काही मान्यता प्राप्त शाळासंचालकांनी व राजकीय पक्षांनी केली असल्यामुळे दिवा शहरातील २५ हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचं भवितव्य टांगणीला लागले आहे. यामुळे सर्व पालक वर्गामध्ये चिंतेचं वातावरण तयार झालं असून आपल्या पाल्याचं शैक्षणिक नुकसान होणार तर नाही ना ? या चिंतेने पालक शाळांमध्ये खेटा मारत आहेत. याशिवाय दिव्यातील मान्यता प्राप्त शाळांमधील फी परवडत नसल्यामुळे व घरापासून जवळचे अंतर यामुळे पालकांना आपल्या पाल्यांचे शिक्षण अशा शाळांमध्ये करण्याशिवाय कोणताही पर्याय उपलब्ध नसल्यामुळे मुलांना शिकवायचे कसे ? या विचारात सर्व पालक वर्ग आहेत.
खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या आदेशानुसार काल 30 पेक्षा जास्त शाळांच्या संचालकांनी शिवसेना शहरप्रमुख रमाकांत मढवी यांच्या नेतृत्वाखाली ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतली, सदर भेटीत सर्व अनाधिकृत शाळांनी मान्यता मिळवण्यासाठी सकारात्मक आश्वासन पालिका आयुक्तांनी दिले असून कठीण काळात शिवसेना कायम दिवावासियांच्या सोबत राहिली असून या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक भविष्य खराब होऊ देणार नाही व मान्यता नसलेल्या शाळांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना प्रयत्न शिल असेल असे मढवी यांनी स्पष्ट केले आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांची देखील भेट घेणार असल्याचे रमाकांत मढवी यांनी सांगितले आहे.




