ठाणे हायस्पीड मल्टीमोडल इंटीग्रेटेड स्टेशन होणार. हायस्पीड रेल्वे स्टेशन परिसर विकासाबाबत आंतरराष्ट्रीय चर्चासत्र.
संतोष पडवळ – ठाणे
ठाणे ता २७ : हाय स्पीड रेल्वे (बुलेट ट्रेन) प्रकल्पामुळे आर्थिक गुंतवणूक आणि रोजगाराच्या संधी वाढणार आहेत. बुलेट ट्रेनच्या ठाणे स्टेशनमध्ये, बुलेट ट्रेन, रेल्वे, मेट्रो, अंतर्गत मेट्रो, बस, जेट्टी ( जलमार्ग), कॅब-रिक्षा स्थानके तसेच लगतचे सर्व मोठे महामार्ग व विशेष रस्त्याद्वारे विमानतळही जोडण्यात येणार आहे. ठाण्यात सर्व वाहतूक सुविधांचे जंक्शन तयार होणार आहे. शहराचे आमूलाग्र परिवर्तन करण्याची क्षमता असलेल्या, राज्यातील हाय स्पीड रेल्वे स्टेशन परिसराच्या विकासात सर्व घटकांनी सक्रीय सहभाग घेण्याची आवश्यकता आहे. त्यादृष्टीने स्टेशन परिसर विकासाची दिशा निश्चित व्हावी यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार, गुजरात सरकार, जपान सरकार, स्थानिक महापालिका, संबंधित घटकांचे प्रतिनिधी यांच्या आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन शुक्रवारी (२६ सप्टेंबर) ठाण्यात करण्यात आले.
मुंबई- अहमदाबाद हाय स्पीड रेल्वे प्रकल्पामध्ये एकूण १२ स्टेशन आहेत. त्यापैकी ४ स्टेशने ( मुंबई, ठाणे, विरार, बोईसर) महाराष्ट्रातील आहेत. या स्टेशन परिसरांचा नियोजनपूर्वक विकास करणे प्रस्तावित आहे. यासाठी भारत सरकार, जपान सरकार व राज्य सरकार यांच्यात सामंजस्य करार झालेला आहे. यापैकी, ठाणे व विरार स्टेशन परिसराचा नियोजनबद्ध विकास आराखडा स्थानिक महापालिका, जपान सरकारचे प्रतिनिधी जायका व नगरविकास विभाग संयुक्तपणे करत आहे. या प्रकियेत नियोजनामध्ये सर्व भागधारक घटकांचा समावेश करून त्यांना नेमक्या कोणत्या गोष्टी अपेक्षित आहेत हे जाणून घेण्यासाठी या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले.
केंद्रीय गृह निर्माण आणि नागरी विकास मंत्रालय, रेल्वे मंत्रालय, नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांच्या नेतृत्वात शहर विकास विभागाने या चर्चासत्राचे संयोजन केले. त्यात, केंद्र सरकारची नगर नियोजन संघटना, जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी (जायका), नगर रचना आणि मूल्यांकन विभाग, ठाणे, कल्याण डोंबिवली आणि वसई – विरार महानगरपालिका यांचे प्रतिनिधी तसेच बांधकाम व्यावसायिक, आर्किटेक्ट, विविध संघटना यांचे प्रतिनिधी या चर्चासत्रात सहभागी झाले होते.





