
संतोष पडवळ – प्रतिनिधी

ठाणे, दिवा ता २५ जून :-खासदार श्री. संजय दिना पाटील यांनी प्रसारमाध्यमांसमोर केलेल्या कथित धमकीच्या वक्तव्याची गंभीर दखल घेऊन त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख व ॲड. रोहिदास बामा मुंडे यांनी मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित झालेल्या व्हिडिओमध्ये खासदार संजय दिना पाटील यांनी कथितरित्या अत्यंत गंभीर स्वरूपाची धमकीची विधाने केली असल्याचा दावा करण्यात आला आहे. या कथित वक्तव्यांमुळे नागरिक व राजकीय कार्यकर्त्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊन सार्वजनिक शांतता व कायदा-सुव्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
तसेच, संबंधित वक्तव्यात करण्यात आलेल्या दाव्यांची सत्यता तपासण्यासाठी निष्पक्ष व सखोल चौकशी करण्यात यावी, आवश्यक असल्यास कायदेशीर प्रक्रियेनुसार संबंधित ठिकाणांची झडती घेण्यात यावी आणि तपासात जे काही निष्पन्न होईल त्यानुसार लागू असलेल्या कायद्यांप्रमाणे कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.याशिवाय, भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील लागू तरतुदींनुसार तात्काळ एफआयआर नोंदवून चौकशी सुरू करावी. तपासादरम्यान इतर कोणत्याही गंभीर किंवा विशेष कायद्यांचा भंग झाल्याचे पुरावे आढळल्यास त्या अनुषंगानेही आवश्यक कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ॲड. रोहिदास बामा मुंडे व सचिन पाटील यांनी केली आहे.
भविष्यात अशा प्रकारच्या कथित धमक्यांमुळे कोणतीही हिंसक घटना घडू नये, तसेच कायद्याचे राज्य अबाधित राहावे, यासाठी पोलीस प्रशासनाने तातडीने आणि निष्पक्षपणे कारवाई करावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. यावेळी निवेदन देताना उपजिल्हाप्रमुख ॲड.रोहिदास मुंडे दिवा शहर प्रमुख सचिन पाटील प्रियंका सावंत शहर समन्वयक नितीन सावंत उपविभाग प्रमुख शाखाप्रमुख शशिकांत कुंभारगन आदी कार्यकर्ते उपस्थित होते



